डीवायएसपींच्या आदेशानुसार शनीपेठ पोलीस कर्मचारी ॲक्शन मोडवर
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आसोदा रोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरातून २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याची मंगलपोत व कानातील सोन्याची बाही चोरून दोन वर्षापासून फरार असलेल्या चोरट्याला शनीपेठ पोलीसांनी पहूर येथून मुद्देमालासह रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अटक केली आहे. भोंदूबाबा हरीष उर्फ हरी गुलाब गदाई रा. देवगाव राजापूर ता. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबबात अधिक असे की, आसोदा रोड परिसरात छाया रतन बाविस्कर या महिला वास्तव्याला आहेत. २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजता घरी कार्यक्रमातील पुजेसाठी महिलेने जवळ सोन्याचे मंगळसुत्र व कानातील सोन्याच्या बाही ठेवले होते. त्यावेळी संशयित आरोपी भोंदू बाबा हा भगवा कपडे घालून महिलेच्या घरी आला होता. त्याने महिलेला तुमच्या घरात दोष असल्याचे सांगितले. तुम्हाला पुजा करावी लागेल असे सांगितले. महिलेने विश्वास ठेवून त्याला घरात बोलावून चहा बनविण्यासाठी त्या घरात गेल्या. त्याच वेळी भोंदूबाबाने महिलेने ठेवलेले २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातील सोन्याच्या बाही घेवून पसार झाला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी हा फरार झाला होता. दरम्यान, संशयित आरोपी हा जामनेर तालुक्यातील पहूर परिसरात असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेडकॉन्स्टेबल परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे आणि पो.ना. भागवत शिंदे असे पथक तयार करून कारवाईसाठी पहूर येथे रवाना केले. पोलीसांनी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी भोंदूबाबा हरीष उर्फ हरी गुलाब गदाई रा. देवगाव राजापूर याला मुद्देमालासह अटक केली आहे.