जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विद्यूत कॉलनीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेची तब्बल ९ लाख ८२ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी १५ जानेवारी रोजी समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, विद्यूत कॉलनी परिसरात ३३ वर्षीय महिला आपल कुटुंबासह वास्तव्याला आहे. २८ नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर २८ नोव्हेंबर रोजी वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकवरून फोन आले. आपण अपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो असे सांगितले. त्यानंतर त्यांनी महिलेला अपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने ९ लाख ८२ हजार रूपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले. दरम्यान, महिलेला नफा आणि मुद्दल ने देता त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी १६ जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे करीत आहे.