जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । वाहनावरील जमा झालेल्या धुळीवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान लिहील्यामुळे बुधवारी सायंकाळी शिरसोलीत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्यांनी तणाव नियंत्रणात आणला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे एका वाहनावर साचलेल्या धूळीवर कोणतरी माथेफिरुने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहीला होता. हा प्रकार गावातील काही तरुणांच्या लक्षात येताच त्याठिकाणी जमाव जमण्यास सुरुवात झाली. काही वेळाताच शेकडोंचा जमाव जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाला शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु रात्री उशिरापर्यंत गावात तरुणांचा जमाव कायम असल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.