नवी दिल्ली-वृत्तसंस्था | जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे नाव ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात रॉबर्ट वड्रासोबत घेण्यात आले असले तरी त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही.
न्यूज १८ या हिंदी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधी वाड्रा यांचा प्रथमच उल्लेख करण्यात आला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रियांका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि थंपी यांच्याशिवाय प्रियंका गांधी यांनीही फरीदाबादमध्ये जमीन खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. संजय भंडारी यांचे निकटवर्तीय थंपी आणि वाड्रा यांच्यातील आर्थिक संबंधाच्या तपासादरम्यान ही बाब समोर आली आहे. मात्र, ईडीच्या या आरोपपत्रात प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांचे नाव आरोपी म्हणून नसले तरी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
फरीदाबादमधील सोने खरेदीशी संबंधित हे प्रकरण आहे. २००५-२००६ दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी फरीदाबादच्या अमीपूर गावात सुमारे ४०.८ एकर जमीन थंपी यांचा निटवर्तीय असणारा प्रॉपर्टी डीलर एच. एल. पाहवा मार्फत खरेदी केली होती. हीच जमीन डिसेंबर २०१० मध्ये पाहवा यांना परत विकली गेली. त्याचप्रमाणे एप्रिल २००६ मध्ये याच अमीपूर गावात प्रियंका गांधी वड्रा यांच्या नावावर घर खरेदी करण्यात आले होते, जे फेब्रुवारी २०१० मध्ये पाहवा यांना परत विकण्यात आले.
रॉबर्ट वाड्रा यांनी कथित मध्यस्थ संजय विरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रकरणात गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा वापर करून लंडनमधील एका घराचे ’नूतनीकरण आणि वास्तव्य’ केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी केला. संजय भंडारी २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये पळून गेला आणि यूके सरकारने ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या कायदेशीर विनंतीवर कारवाई करत, या वर्षी जानेवारीमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली.
दोन्ही केंद्रीय संस्था परदेशात कथितपणे अघोषित संपत्ती ठेवल्याबद्दल व्यावसायिकाविरुद्ध मनी लॉंड्रिंग आणि कर चोरीच्या आरोपांची चौकशी करत आहेत. या प्रकरणात ईडीने वड्राचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईडीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांनी या प्रकरणी यूएई-स्थित अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यापारी सीसी किंवा चेरुवथुर चकुट्टी थम्पी आणि यूकेचे नागरिक सुमित चड्ढा यांच्याविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले आहे.