चाळीसगाव (दिलीप घोरपडे)। चाळीसगाव शहर व तालुक्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली असुन, पोलिस विभाग फक्त औपचारिकता पार पाडते अशी चर्चा आहे. नुकतीच नागद रोड नविन पाण्याच्या टाकीच्या परिसरात रमजान ईदनिमित्त दुसऱ्या घरी गेलेल्या शिक्षक जहीर शेखच्या बंद घरात चोरांनी ईदच्या मध्यरात्रीच धाडसी घरफोडी करत 1 लाख रूपये लांबविले. तीन वर्षापुर्वी याच परिसरातील शिक्षक अजिज खाटीक यांच्या घरात झालेली घरफोडी व ह्या घरफोडीत कमालीचे साम्य आढळुन आले. तरी पोलिसांनी अद्याप तपासाच्या दिशेने काहीच कार्यवाही केली नाही.
पोलीसांच्या अशा कारभारामुळे परिसरात चर्चा आहे की, या दोन्ही चोरींची पद्धत बघता चोरटे एकच व याच परिसरातील माहितगार आहे, ते चोरी करुन रात्रीच विविध महानगरात जातात व पोलिसांना गुंगारा देतात. या परिसरात दिवसरात्र पत्त्यांचे क्लब सुरु असुन त्याकडेही पोलिसांनी कानाडोळा केला असे जरी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. चोर व जुगार खेळणाऱ्यांनी या भागातील सर्व कुत्र्यांना विषारी पदार्थ खाऊ घालुन गायब केले आहे. तसेच अवैध भंगार व्यावसायिकांनी या भागात भंगार खरेदी विक्रीची दुकाने नागरी वसाहतीत थाटली आहेत. येथे गाड्यांची तोडफोड केली जाते. चोरीचा माल या भंगार दुकानांमध्ये येत असेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षापुर्वी रात्री व दिवसाही या भागात पोलिसांचे २/३ पेट्रोलिंग वाहने यायचीत ती वाहने व त्यांचा आवाज दिसेनासा झाला आहे. संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी इकडे फिरकतच नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जाते. नविन आलेल्या अधिकाऱ्यांना काही जुने कर्मचारी शहर व परिसराविषयी खोटी माहिती देतात की, साहेब इकडे सर्व आलबेल आहे, असे सांगुन अंधारात ठेवतात व अधिकारी त्यांच्या भुलथापांना बळी पडतात,चोरीचे सोने-चांदी परिसरात व तालुक्यातच विकले जाते अशी सुद्धा चर्चा आहे. तरी या भागात पोलीस गस्त वाढवावी,राजरोसपणे सुरु असलेला जुगार, भंगार विक्री हे बंद करावे. विशिष्ट घरी पोलिसांनी डायरी ठेवावी.
या कामात नविन अप्पर पोलिस अधिक्षक सचिनजी गोरे, डी.वाय.एस.पी.उत्तमराव कडलग, पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी जातीने लक्ष घालावे. अन्यथा या भागातील नागरिक पोलीस महानिरिक्षक नाशिक व पोलीस अधिक्षक जळगाव यांना निवेदन देऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडतील असे आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे. पोलिस काहीही कार्यवाही करीत नाही, गस्त व पेट्रोलिंगमध्ये प्रामाणिकता जपत नाही मग ते गुन्हेगारांचे हितसंबंध तर काही कर्मचारी जोपासत नाही ना ? अशी जोरदार चर्चा शहर व परिसरात सुरु आहे.