मुंबई-वृत्तसेवा | मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अशोकराव शिंदे यांनी राज्यपालांकडे तक्रार करून केली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे सध्या वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अशोकराव शिंदे यांनी राज्यपालांकडे लेखी तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे वारंवार सोशल मीडियातून आणि जाहीर सभांमधून राज्यातील मराठा समाजावर नकारात्मक टीकाटिप्पणी आरोप, समाजा समाजामध्ये सामाजिक द्वेष व तेढ निर्माण करून असंतोष निर्माण करीत आहेत.
लोकशाही मार्गाने आपल्या हक्काची मागणी करणार्या मराठा समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासन सकारात्मक असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या बाबतीतही जाहीरपणे नकारात्मक भूमिका घेऊन संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे.
तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासन आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आपण छगन भुजबळ यांना संवैधानिक आणि गोपनीय ती शपथ दिलेली आहे. या शपथेचा भंग करून भुजबळ शासन द्रोह करीत आहेत. ही संवैधानिक लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी बाब आहे. याची दखल घेऊन आपण याची तातडीने सखोल चौकशी करून भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व त्यांना योग्य ती समज द्यावी.
यदा कदाचित मंत्री छगन भुजबळ यांच्या सामाजिक तेढ निर्माण करणार्या वक्तव्यांमुळे राज्यात जातीय दंगली जर झाल्या तर याला सर्वस्वी जबाबदार भुजबळच असणार आहेत. असे होऊ नये. जातीय सलोखा कायम राहावा सर्व समाजाच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावं यासाठी आपल्या नेतृत्वाखालील पुरोगामी महाराष्ट्र शासनाने कठोर निर्णय घ्यावा अशी मागणी या तक्रारीत करण्यात आलेली आहे.