जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठाणे, पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावातील सिंधी कॉलनीत सुरू असलेल्या सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे वर्सी महोत्सवात पोहचले. त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्या वेळी वरील पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन पाठलाग करून अटक केली. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.