जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेवून मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता त्यांनी पत्रकार परिषद घेवून सरकारला इशारा दिला आहे. येत्या २४ ऑक्टोबर पर्यंत मराठा सामाजाला आरक्षण द्यावं अन्यथा तीव्र उपोषण करण्याचा इशारा पत्रपरिषदेतून देण्यात आला आहे.
मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारची वेळ संपत चालली आहे. राज्य सरकारनं २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास २५ तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. या उपोषणादरम्यान कोणतेही पाणी, औषध घेतलं जाणार नाही. तसंच कडक उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला आमच्या गावात येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात या. २५ तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातील गांवामध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २८ पासून याच साखळी उपोषणाचं अमरण उपोषणात रूपांतर होईल, अशी तयारी मराठा समाजानं केल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिलं, तर गुलालानं भरलेल्या गाड्या येतील. अन्यथा माणसं भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.