बोदवड प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी २१ जून रोजी निवडणूक होत असून यात प्रचंड चुरस होण्याची शक्यता आहे.
बोदवड नगराध्यक्षपदाची अडीच वर्षांनंतर २१ जून रोजी निवडणूक होत आहे. यावेळी ही जागा ओबीसी महिला आरक्षित आहे. यासाठी सत्ताधारी भाजपा यांच्या कडून विद्यमान नगराध्यक्ष मुंताजबी सईद बागवान तर राष्ट्रवादी पक्षाकडून वंदना विजय पालवे व काँग्रेस पक्षाकडून सुशीला आनंदा पाटील यांचे नामनिर्देशन अर्ज तहसीलदार रवींद्र जोगी यांचेकडे दाखल झालेले आहेत.
बोदवड नगरपंचायतमधील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे सात, राष्ट्रवादीचे चार, काँग्रेसचे दोन तर शिवसेना एक व अपक्ष तीन असे सदस्य आहेत. गत नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा एक बंडखोर तर एक अपक्ष नगरसेवक अकबर बेग समशेर बेग यांच्या सहकार्याने भाजपने बोदवड नगरपंचायतीवर सत्ता स्थापन केली होती. प्रथम नगराध्यक्ष म्हणून मुंताजबी सईद बागवान याना सर्वसाधारण जागेसाठी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती. आता त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी आपापला उमेदवार दिला असून भाजपकडून उपनगराध्यक्ष पद बद्दलवण्याची हालचालींना गतिमान होत आहेत. विरोधी राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी आघाडी मिळून एक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिल्यास नगराध्यक्षपदासाठी घोडेबाजार होऊ शकतो. त्यामध्येही तत्कालीन बंडखोर शिवसेनेचे उपनगराध्यक्ष नितीन चौहान यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता, भाजपकडे पुन्हा सत्ता राहणार की विरोधक बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.