यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. यावल महाविद्यालय व यावल तहसील यांच्या वतीने हा करार तीन वर्षासाठी करण्यात आला असे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून यावल तहसीलच्या तहसीलदार मा. मोहनमाला नाझीरकर व यावल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्यात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ पर्यंतअसा तीन वर्षाचा करार करण्यात आला. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना समाजामध्ये विद्यार्थ्यांमार्फत रॅली, पथनाट्य व पोर्टल संवाद यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. ‘उन्नतीसाठी युवा, हाच दुवा’असे शेकडो विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. शासनाच्या महसूल विभागा मार्फत विविध योजना लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचतील तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील, प्रा.एम.डी. खैरनार, यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक निर्णय अधिकारी रशीद तडवी, प्रा.मुकेश येवले, डॉ.एस.पी. कापडे, डॉ.एच.जी.भंगाळे, डॉ. पी. व्ही.पावरा, प्रा.मयूर सोनवणे मिलिंद बोरघडे आदि उपस्थित होते.