गौरी गणपतीसाठी राज्यातील नागरिकांना १०० रूपयात आनंदाचा शिधा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी गौरी गणपतीच्या काळात राज्यातील नागरिकांना १०० रूपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 

राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात अनेक निर्णय घेण्यात आले. यातील लक्षवेधी निर्णय हा आनंदाचा शिधा प्रदान करण्याचा आहे. शिंदे सरकारने गेल्या दिवाळीत नागरिकांना आनंदाचा शिधा प्रदान केला होता. यात अल्प मूल्यात जीवनावश्यक साहित्य देण्यात आले होते. याच प्रकारे आता आगामी गणेशोत्सवाच्या काळात १०० रूपयात आनंदाचा शिधा मिळणार आहे. यात एक किलो रवा, चणाडाळ, खाद्यतेल व साखर या घटकांचा समावेश असणार आहे.

 

दरम्यान, आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत अन्य निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच यात राज्याचा हिस्सा वाढला गेला आहे.

 

यासोबत आजच्या बैठकीत सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आलेला आहे. सहकार विभागाच्या अंतर्गत दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकार्‍यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंडणगड येथे दिवाणी न्यायालय उभारण्याचा निर्णयही झालेला आहे. आदिवासी विकास खात्यासाठी देखील आज निर्णय झाला असून याच्या अंतर्गत राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्यात येणार आहे. तसेच, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना अंमलात येणार असून ५ हजार कोटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

 

 

आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना आता दरमहा ५०० रुपये विद्यावेतन मिळणार असल्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Protected Content