कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । कोल्हापूर शहरासह जिल्ह्या पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ३८ फुट २ इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ आणि धोका पातळी ४३ फूट आहे.
पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरीत होण्याचा सूचना दिल्या जात आहेत. कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहित्यासह गाव सोडण्यासाठी सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी आल्याने ते लवकर उघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.