जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील ३४ वर्षीय तरूणाने कौटुंबिक नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहूल उर्फ अमोल विठ्ठल पाटील (वय-३४) रा. नांद्रा ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, राहूल पाटील हा जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्यांचे घर दुमजली असून वरच्या घरात मोठा भाऊ व त्याची पत्नी राहतात तर खालच्या घरात आईसोबत राहूल राहत होता. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. सहा महिन्यापुर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे काही दिवसांपासून तो तणावात होता. रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांची आई कमलबाई ह्या मंदीरात गेल्या. त्यामुळे राहूल घरात एकटाच होता. त्याने राहत्या घरात नैराश्येतून गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची आई कमलबाई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई, मोठा भाऊ महेश आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.