जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे चौकातील कोंबडी बाजार परिसरात बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी वृध्दाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान शुक्रवारी १६ जून रोजी दुपारी ४ वाजता मृत्यू झाला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलीसांनी केले असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील बेंडाळे चौकजवळील कोंबडी बाजार परिसरात १२ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनोळखी अंदाजे साठ वर्षीय वृध्द व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. नागरीकांनी पोलीसांनी जिल्हापेठ पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून अनोळखी वृध्दाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवारी १६ जून रोजी वृध्दावर उपचार सुरू असतांना दुपारी ४ वाजता मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयतची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.