उभ्या ट्रकवर आयशर धडकली : दुरूस्ती करणारा वाहक ठार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दुरूस्तीसाठी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव आयशर धडकल्यामुळे दुरूस्ती करणारा ड्रायव्हर ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगरला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास एमपी ०९ एचएच ६४४३ क्रमांकाचा ट्रक बंद पडला. यात नेमकी काय अडचण झाली हे पाहण्यासाठी यावरील वाहक बदामसिंग हरनामसिंग चव्हाण हे खाली उतरले. वाहनाच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते याच्या दुरूस्तीचे काम करू लागले.

 

दरम्यान, याच सुमारास जीजे ०३ बीवाय १८८७ क्रमांकाचा भरधाव आयशर ट्रक या उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. यामुळे उभा असलेला ट्रक हा पुढे ढकलला जाऊन बदामसिंग चव्हाण ( वय ३४, रा. पिंप्रीखेडा, ता. बडवानी, जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ) यांचे पाय व डोक्याला दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. तर, अपघात झाल्यानंतर आयशर ट्रकवरील वाहकाने पलायन केले.

 

या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवम इंदरसिंग कनासे ( वय १९, रा. पिंप्रीखेडा, ता. बडवानी, जिल्हा खरगोन मध्यप्रदेश ) याने दिलेल्या फिर्यादीवरून जीजे ०३ बीवाय १८८७ क्रमांकाच्या आयशरवरील वाहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संदीप चेढे आणि तपासी अंमलदार संतोष चौधरी हे करत आहेत.

Protected Content