जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सत्यम पार्क येथे तरुणाचे बंद घर फोडून घरातील तिजोरीतून रोकड आणि दागिने असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. या संदर्भात गुरुवार २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक सुरेश जोहरे (वय-३४) रा. सत्यम पार्क, आव्हाने शिवार, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ एप्रिल दुपारी ३ ते २७ एप्रिल सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अशोक जोहरे याचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरात प्रवेश करून कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता समोर आला. अशोक जोहरे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता अशोक जोहरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.