जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवयवदान श्रेष्ठ दान असून नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रचार व प्रसारासाठी पुढे आले पाहिजे. अवयवदान मोहिमेसाठी शासकीय पातळीवर विविध विकासात्मक निर्णय घेतले जातील. अवयवदानामुळे प्रसंगी अनेक व्यक्तींचे जीव वाचू शकतात, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अवयवदान जनजागृती व उपचार अभियानास शुक्रवारी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत जनजागृती अभियानाचे फलक हाती घेऊन मान्यवरांनी अभियानाला सुरुवात केली. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगिता बावस्कर, नोडल ऑफिसर डॉ. सुनयना कुमठेकर मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून देवी धन्वंतरीच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यांनतर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभियान कसे राहील, त्याचे स्वरूप सांगितले. यावेळी अवयवदान केलेल्या नातेवाईकांचा व जनजागृती करणारे डॉ. पल्लवी राणे, डॉ. रवींद्र पाटील, सीमा भगत, किशोर सूर्यवंशी यांचा पालकमंत्री ना. पाटील यांनी सत्कार केला.
अवयवदान जनजागृतीबाबत महाविद्यालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उदघाटन पालकमंत्री ना. पाटील यांनी केले. तसेच रांगोळी, पोस्टर्सचे अवलोकन केले. याठिकाणी जनजागृतीपर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर त्यांनी सेल्फी घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री यांनी ट्रॉफी देऊन गौरविले. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्या ग्रुपचादेखील सत्कार पालकमंत्र्यांनी केला. यावेळी अवयवदान जनजागृतीची उपस्थितांना शपथ देण्यात आली.
ना. गुलाबराव पाटील यांनी प्रसंगी, आपल्या भारत देशाने वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली आहे. आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. मृत्यूपश्चात अवयवदान करून साधारण आठ जणांचे आयुष्य वाचू शकते. नेत्रदान, त्वचादान यांसारखे दान करून अनेकांचे आयुष्य आपण बदलू शकतो, असे सांगितले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तर आभार डॉ. योगिता बावस्कर यांनी मानले. यावेळी विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णांची चौकशी
कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णालयातील सेवा-सुविधांविषयी अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांचेकडून माहिती घेतली. डॉक्टरांच्या कार्याविषयी पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
स्पर्धेतील विजेते
पोस्टर स्पर्धा – प्रथम : प्रतिज्ञा मोरे व कृष्णाई साळुंखे, द्वितीय : हनीफा मोमीन, तृतीय : प्रियंका शेळके.
रांगोळी स्पर्धा – प्रथम : गीतांजली आवारे, समृद्धी कवडे, द्वितीय : निकिता बाऱ्हे, पूजा दैठणकर, तृतीय : अंशीका मौर्या, साक्षी मोहर.