जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुट्टीवर आलेला जवानाचा जीना उतरतांना चक्कर येऊन पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कांचन नगरात घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल भरत सैंदाणे (वय-३५) रा. कांचन नगर, चौगुले प्लॉट, जळगाव असे मयत झालेल्या जवानाचे नाव आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विशाल सैंदाणे हा भारतीय सैन्य दलात नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर घरी कांचन नगर येथे आलेला होता. बुधवारी १५ मार्च रोजी रात्री ९ वाजता घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना विशालला चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला होता. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. एकुलता एक मुलाचे अचानक अपघाती निधन झाल्याने आई-वडिलांवर व पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरूवार १६ मार्च रोजी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय शेलार करीत आहे. मयता जवानाच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहिण असा परिवार आहे.