पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थानाची नवीन विश्वस्त संस्था सुरू करण्याचा डाव रचण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे १७ वर्षांपासून ट्रस्ट अस्तित्वात असताना अनधिकृत स्वयंघोषित आरती समितीच्या माध्यमातून काही लोकांनी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याचा डाव रचल्याचे उघड झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून भाविक संतप्त झाले आहेत .
श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे पहुर येथून शेंदुर्णी मार्गावर दोन किलोमीटर अंतरावर वसलेले भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे शिवभक्त रंगनाथ महाराज पुजारी म्हणून सेवा करत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाद्वारे या मंदिराचा विकास आणि जिर्णोद्धाराचे कार्य लोक सहभागातून होत आहे. या मंदिरावर २००६ मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आली असून ई १०८६ असा नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे. शिवभक्त रंगनाथ महाराज हे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या धुरा सांभाळत आहेत.
दरम्यान, गावातील काही लोकांनी ट्रस्टची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत रित्या स्वयंघोषित आरती समिती स्थापन करून मंदिराच्या नावात फेरबदल करून एकाच मंदिरावर नवीन ट्रस्ट स्थापन करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव येथे प्रस्ताव दाखल केल्याचे उघड झाले आहे . त्यामुळे आरती समितीचे पितळ उघडे पडले असून नेमका मंदिरावर व मंदिर परिसरात असलेल्या खुल्या भूखंडावर कब्जा मिळवणे हा तर समितीचा विचार नाही ना ? असा सवाल संतप्त भाविक करीत आहेत .
याप्रकरणी ट्रस्टतर्फे धर्मदाय आयुक्त जळगाव यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आल्या आहेत .या प्रकरणामुळे पहूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.