जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ. प्रदीप सुरवाडकर यांना ‘भगवान गौतम बुद्ध विश्वशांती समाजसेवा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यालय गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती संचलित श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.
बिंदूबाई समाज कार्यालय जैनाबाद जळगांव येथे दिनांक 2 जून रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यालय गुरुकुंज आश्रम मोझरी जिल्हा अमरावती संचलित श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्यभरातून कानाकोपर्यातील तब्बल 150 पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन हरिश्चंद्र माधव बाविस्कर यांनी केले. तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून साहित्यिक अ.फ. भालेराव हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले एकूण दहा प्रकारची पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले. त्यापैकी प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘भगवान गौतम बुद्ध विश्वशांती समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. तर राहुल निकम यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न सेवा पुरस्कार देण्यात आला. असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.