नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पराजीत करून मैदान मारले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा खूप घडामोडी घडल्या. कॉंग्रेसने मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिल्यावरही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने खळबळ उडाली. तर यामुळे दुखावलेल्या भाजपच्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला. निवडणुकीच्या प्रचारात सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी भाजपचे नेते आणि पदाधिकारी उभे असल्याचे चित्र दिसून आले होते. तर शेवटच्या टप्प्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील तांबे यांना पाठींबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते.
या पार्श्वभूमिवर, काल दुपारी दोन वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. यात पहिल्यापासून तांबे यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांना ६८ हजार ९९ इतकी मते मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते मिळाली. अर्थात सत्यजीत तांबे यांनी मविआच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी पराजय केला.