यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहिती अधिकाराच्या अर्जावरून चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयातील दलील वस्तीचे रजीस्टर मिळेनासे झाले असून ग्रामपंचायत कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला आहे. संविधान रक्षक दल भीम आर्मीचे सुपडू संदानशिव यांनी महिती अधिकाराचा अर्ज केल्याचे हे उघडकीला आले आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत मध्ये सुपडू संदानशिव यांनी दिलेल्या माहीतीनुसार, सद्यस्थित चुंचाळे येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्याकडे माहिती मागवली असता ग्रामसेवक यांनी माहितीद्वारे सांगितले आहे की, सदर दलीत वस्तीचे रजिस्टर तत्कालीन ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी मला दिलेच नाही असे म्हटले आहे.
या विषयी सविस्तर माहीतीव्दारे खुलासा व्हावा म्हणून संदानशिव यांनी पंचायत समिती यावलचे गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दाखल केला. त्यांनी दिलेल्या माहितीद्वारे असे निदर्शनास आले आहे की, सदर दलीत वस्तीचे नोंदणी रजिस्टर हे गहाळ झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबतच्या अपील अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रथम अपील अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांच्या दालनात सकाळी ११:३० घेण्यात आलेल्या सुनावणीत माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रा.पं. चुंचाळे ता.यावल यांच्याकडे अर्ज करून २०१७ ते आज पावेतो दलीत वस्तीत झालेल्या विकास कामांची माहिती मिळणे बाबत माहिती मागणी केली आहे. अपिलार्थी यांना विचारणा केली असता, मला माहिती मिळाली नाही असे सांगितले, तर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक यांना विचारणा केली असता मला तत्कालीन ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी योजनेचे दप्तर ताब्यात दिलेले नसल्याने मला माहिती देता आली नाही. सदर ग्रामसेवक बाबत मी अहवाल दिलेला आहे व अपीलार्थी १५ ऑगस्ट २०२२ च्या पत्रानव्ये कळविले आहे तसेच तत्कालीन ग्रामसेवक यांना या कार्यालया मार्फत नोटीस बजावून सदर ग्रामसेवक यांचे कडून दप्तर उपलब्ध करून विद्यमान ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात असलेली सर्व माहिती दप्तर उपलब्ध झाल्या नंतर १० दिवसाचे आत विनामूल्य पुरविण्यात यावी, असे सुपडू संदानशिव यांना प्राप्त झालेल्या पत्रकात म्हटले आहे.
आज तीन महिने होवूनही अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही तसेच दलीत वस्तीचे दप्तर गहाळ झाल्याने गावातील दलीत वस्ती मधील कामांचा विकास कसा होईल व संबधित ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांच्या वरती कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही संबधित ग्रामसेवक व अधिकारी यांच्यात साठे लोटे आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे तर २०१७ ते २०२२ या वर्षा अंतर्गत दलीत वस्ती मध्ये झालेल्या कामानध्ये मोठ्या प्रमाणात घोळ/ भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.