चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड वनपरिक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन करताना २ ट्रॅक्टर व जेसीबी असा १० दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ६०४७ मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना मिळाली. त्यावर तत्काळ त्यांनी पथकासह सदर घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गौण खनिज होताना दिसून आल्याने पथकाने दोन ट्रॅक्टर (क्र. एम.एच.२० सी ४३०४),(क्र. एम.एच.१९ पी २५५७) व जेसीबी (क्र.एम.एच.१९ बीजी १६५२) असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी संशयित आरोपी रवींद्र भीमराव गायकवाड, शंकर राजेंद्र कोळी, परशुराम ताराचंद पवार सर्व रा. बिलाखेड ता. चाळीसगाव यांना ताब्यात घेऊन भारतीय वन अधिनियम १९२६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे अवैद्य धंद्या करणाऱ्यांच्या गोट्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चौरे (जुवार्डी), वनरक्षक योगेश देशमुख, आर.वी. पवार, के. बी. पवार, सी. व्ही. पाटील, वनमजूर बाळू शितोडे, भटू अहिरे, दिनेश कुलकर्णी व चालक राहुल मांडोळे आदींनी केली आहे.