यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले असून गावनेत्यांच्या पॅनेलला मतदारांनी जोर का झटका दिला असून दुसऱ्यांना संधी दिल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
यावल तालुक्यातील ८ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावल तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. याप्रसंग तहसिलदार महेश पवार, निवासी नायब तहसिलदार संतोष विंनते, निवडणुक नायब तहसिलदार आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवार समर्थकांनी जल्लोष केला.
तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी झाली. आठही ग्रामपंचायतीत कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविली नसली तरी राजकीय पक्षाकडून दावे प्रति दावे केले जात आहेत. यात १७ सदस्य संख्या असलेल्या सर्वात मोठया ग्रामपंचायतच्या न्हावी प्र. यावल येथील सरपंचपदाचे उमेदवार देवेंद्र भानुदास चोपडे हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले असून ते ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मसाका चेअरमन शरद महाजन यांचे विश्वासू तथा पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार तथा जिल्हा दूध संघाचे नवनिर्वाचित संचालक नितीन चौधरी यांचा त्यांनी दोन हजार ३४३ मतांनी पराभव केला आहे. या लढतीकडे तालुकावाशीयांचे लक्ष लागून होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मतमोजणीचा प्रारंभ झाला पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात सगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.