जळगाव प्रतिनिधी । येथील भुसावळ रोडवरील श्री स्वामिनारायण मंदिर असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मंदिरातर्फे विविध धार्मिक उत्सवासोबतच समाजोपयोगी उपक्रमही राबविले जातात. त्यात भगवान स्वामिनारायण जन्मोत्सव, गुरुपौर्णिमा उत्सव, हिडोळा उत्सव, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पुजा व अन्नकोट, रामनवमी उत्सवाचा सामावेश आहे. असंख्य भाविक येथे हजेरी लावून भजन, किर्तन, महाप्रसाद घेवून तृप्त होतात. सामाजिक उपक्रमामध्ये मंदिरातर्फे विमलताई रघूनाथ पाटील नेत्रालयात मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया विभागही सुरु केलेला आहे. त्यात आतापर्यंत शस्त्रक्रिया मोफत झालेल्या आहे. गरिबांना उन्हाचे चटके बसू नये यासाठी मोफत चप्पल वितरणाचा कार्यक्रम झाला. बालकांवर लहान वयापासून चांगले संस्कार व्हावेत, त्यांचे भावी आयुष्य यशस्वी व्हावे, ते समाजाला मार्गदर्शक व्हावे, यासाठी बालसंस्कार शिबीर घेतले जातात.
मंदिरातर्फे दरवर्षी पन्नास झाडांचे वृक्षारोपण केले जाते. प्रत्येक रविवारी रविसभा घेतली जाते. एकादशी सत्संग सभा होते. प्रत्येक पौर्णिमाची हरिभक्ताकडून उजवणी होते. दरवर्षी पितृपक्षामध्ये सप्तदिनात्मक कथा होते. वडताल येथे मराठी कथेचे आयोजन केले जाते. यावल तालुक्यांतील गावोगावी भागवत सप्ताह पारायणाचे आयोजन होते. श्री स्वामिनारायण मंदिराचे प्रणेते प.पु.स.मु स्वामि गोंविद प्रकाशदास, अध्यक्ष संयोजक शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदास, मंदिर कार्यकर्ते अतुल भगत शास्त्री नयन प्रकाशदास, शास्त्री चैतन्य प्रकाशदास, प्रमोद झांबरे यांच्यासह मंदिराचे ट्रस्टी मंडळी परिश्रम घेत आहे.