विद्यापीठात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९  ते २८  डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर – आव्हान २०२२ आयोजन करण्यात आले असून  विद्यापीठात प्रथमच हे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर होत आहे. शिबिरात राज्यभरातील २३ विद्यापीठांचा सहभाग राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. व्ही.एल. महेश्वरी यांनी शुक्रवारी (दि. १६ डिसेंबर) रोजी  पत्रकार परिषदेत दिली.

 

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर – आव्हान २०२२ या शिबिरात २३ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे ९६८  स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.  यात ५६३  विद्यार्थी व ४०५ विद्यार्थिनीचा समावेश असणार आहे. याशिवाय ३९  पुरुष संघ व्यवस्थापक व २६  महिला व्यवस्थापक सहभागी होणार आहेत, अशी माहिती कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्‍वरी यांनी दिली. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, आव्हानचे समन्वयक प्रा. किशोर पवार उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. माहेश्‍वरी यांनी सांगितले की, शिबिराचे उद्घाटन सोमवारी (१९  डिसेंबर) सकाळी अकराला राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ)चे कमांडर एस. बी. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी व प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. २८ डिसेंबर रोजी प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार असून, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार हे प्रमुख पाहुणे असतील. तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची प्रमुख उपस्थिती असेल. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, प्रादेशिक संचालक डी. कार्तिकेयन यांची उपस्थिती असेल. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी अध्यक्षस्थानी असतील.

शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, शिबिराच्या यशस्वितेसाठी २२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २१० सदस्यांचा समावेश आहे. शिबिरात पूर, सर्पदंश, अपघात, ह्रदयविकार, आग, भूकंप आदी आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेऊन जीवित व वित्तहानी टाळता येईल, याबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोज सकाळी सहा ते आठ या वेळेत कवायत, योगा, मेडिटेशन; त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, साडेबारा ते दोन भोजन आणि दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पुन्हा आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर २१  ते २५  डिसेंबरदरम्यान सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी दहा मिनिटांचा कालावधी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग प्रशिक्षण सहा सभागृहांमध्ये होणार असून, रासायनिक तंत्रज्ञान संस्था, अधिसभा सभागृह, सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे दोन सभागृह, गणितशास्त्र प्रशाळेचे दोन सभागृह, अशा एकूण सहा सभागृहांत ते वर्ग होतील. १८०  ते २००  विद्यार्थ्यांचा एक, याप्रमाणे पाच गट करण्यात आले असून, या गटांना खानदेशातील तापी, पांझरा, वाघूर, बोरी आणि गिरणा या नद्यांची नावे देण्यात आली आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे हे तंत्रशुद्ध प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ५० तज्ज्ञ व्यक्ती देणार आहेत. वर्गखोलीतील शिक्षणाशिवाय मेहरुण तलाव, विद्यापीठ जलतरण तलाव आणि विद्यापीठातील प्रशासकीय इमारत या ठिकाणीही सराव घेण्यात येईल.

विद्यापीठात प्रथमच राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर होत असून, यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडून प्रत्येक संघाची नोंदणी केली गेली आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे येणार्‍या संघांना निवासाची माहिती अगोदरच कळविणे सोपे झाले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांचे ओळखपत्र, प्रमाणपत्र तयार करणेदेखील सोपे होणार आहे. येणार्‍या विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था विद्यापीठातील मुलांच्या तीन वसतिगृहात करण्यात आली आहे, तर मुलींची निवासव्यवस्था एपीजे अब्दुल कलाम वसतिगृह, बाबू जगजीवनराम वसतिगृह आणि अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह या तीन ठिकाणी करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी त्यांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तज्ज्ञांची व्यवस्था शिक्षक भवनात करण्यात आली आहे.

यावर्षी राजभवन कार्यालयाने संघ निवडताना काही निकष लावले असून, त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला स्वंयसेवकांचे वजन ५०  किलोपेक्षा अधिक व उंची १५५  सेंटिमीटरच्या पुढे व हिमोग्लोबिन १२  असणे आवश्यक आहे, तर विद्यार्थी स्वंयसेवकांसाठी वजन ५५  किलोपेक्षा अधिक आणि उंची १६५  सेंटिमीटरच्या पुढे व हिमोग्लोबिन १२ च्या वर असणे आवश्यक आहे. त्या त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यातील १५  विद्यार्थी आणि १०  विद्यार्थिनींचा समावेश बंधनकारक करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे भारतातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. २००७  पासून या प्रकारचे राज्यस्तरीय आव्हान शिबीर घेतले जात आहे. २६  डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी प्रथमच राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्वजाचे रोहन होणार आहे.

 

Protected Content