चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील नगरपरिषद व ग्रीनी द ग्रेट, पुणे यांच्या विद्यमाने नगरपरिषद कार्यालयात आज (दि. ३० मे) सकाळी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५ जुन रोजी शहरात पर्यावरण दिन साजरा करण्यासंदर्भात तसेच पर्यावरणात्मक संदेशपर भिंत चित्रणाच्या माध्यमातून जनजागृती, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तसेच बालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.
यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, ग्रीनी द ग्रेडचे प्रकल्प प्रमुख माधव पंडीत, ग्रीन मिशन फाऊंडेशन अध्यक्षा उमा चव्हाण, किमया गृपचे शालीग्राम निकम, जलसाक्षर अभियानाचे स्वप्नील कोतकर, स्वयंभू प्रतिष्ठानचे शांताराम पाटील, उत्कर्ष गृपचे प्रा.तुषार निकम यासह नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छाग्रह अभियानास शहरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभत असुन याची व्याप्ती अधिकतम वाढविण्यासाठी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत अभिनव संदेश देण्यासाठी शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकांना नगरपरिषदेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी प्रशासन अधिकारी न.प.शिक्षण मंडळ डी.व्ही माळी, शहर अभियान व्यवस्थापक किरण निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन निकुंभ, तुषार नकवाल यांच्यासह बरेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.