जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकारामवाडी येथे राहणाऱ्या तरुणाला भांडणाच्या वादातून शिरसोली नाका येथे पाठलाग करून पकडून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकारसमोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुशाल मुकुंदा ठाकूर (वय-१८) रा. तुकारामवाडी जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दोन दिवसांपूर्वी खुशाल ठाकूर याचा भाऊ पियुष ठाकूर याचे आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर आणि पवन उर्फ बद्दू बाविस्कर दोन्ही रा. तुकाराम वाडी यांच्याशी वाद झाला होता. या वादाचा रागातून मंगळवार १३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता खुशाल ठाकूर हा शिरसोली नाका येथून जात असताना आकाश आणि पवन यांनी त्याचा रस्ता आडवला. भावासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून खुशालसह त्याच्या भावाला जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर खुशाल ठाकूर हा घराकडे पळत सुटला. त्यावेळी आकाश आणि पवन यांच्यासोबत असलेले चेतन आणि उमाकांत यांनी देखील पाठलाग केला. शिवीगाळ करून दमदाटी केली व जीवे ठार पाण्याची धमकी दिली. याप्रकरणी खुशाल ठाकूर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता संशयित आरोपी आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर, पवन उर्फ बद्दू बाविस्कर दोन्ही रा. तुकारामवाडी, चेतन उर्फ बटाट्या रा. खोटे नगर आणि उमाकांत उर्फ उम्या रा. पिंप्राळा या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.