जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील केळीचे झाडे म्हशीने खाल्ल्याच्या रागातून भोकर गावातील सरपंचाने रागातून म्हशीच्या पोटावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी १ डिसेंबर रेाजी दुपारी २ वाजता भोकर गावात घडली आहे. जखमी झालेल्या म्हशीवर पशू वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर गावातील रहिवाशी लिलाधर वामन सोनवणे हे शेतकरी असून त्यांच्याकडे म्हैशी आहेत. दरम्यान, म्हैशीला गावातील कळपात चारायला सोडले जाते. कळपात चरत असतांना गावातील सरपंच हरीश डिगांबर पवार यांच्या शेतात जावून केळीचे चार ते पाच झाडे खावून नुकसान केले. याचा राग आल्याने गुरूवारी १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास म्हशीचे मालक लिलाधर सोनवणे यांना काहीही न सांगता सरपंच हरीश पवार याने थेट हातीतील कुऱ्हाड म्हशीच्या पोटावर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान, गावातील काही नागरीकांनी तातडीने पशूवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून प्राथमिक उपचार केले. यासंदर्भात अद्याप पोलीसात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.