जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शनीवार ता. २६ रोजी ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा.डॉ. राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख, प्रा. तन्मय भाले, प्रा.कल्याणी नेवे, प्रा. मोनाली शर्मा, प्रा.राहुल त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रफिक शेख यांनी केले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या त्रिसूत्रीवर आधारलेला, काळाबरोबर बदलण्याची क्षमता असलेला सर्वश्रेष्ठ कायदा म्हणजे संविधान हे सांगतानाच त्यांनी संविधानाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेतला. तसेच यावेळी संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, प्राध्यापकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले व संविधानातील उद्देशांचे पालन करतील व कायद्याची बांधिलकी मानतील अशी शपथ विध्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या कि, संविधानाप्रती आपले प्रेम आणि बांधिलकी व्यक्त करण्याचा तसेच संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांच्या स्मृती जागविण्याचा हा दिवस आहे.
‘भारतीय संविधान हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून लाभलेला सर्वात मौल्यवान दागिना आहे. संविधानाच्या मातृरूपी छायेखाली सर्व भारतीयांचे जीवन सुकर झाले आहे.’ यावेळी त्यांनी संविधानाने दिलेल्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्यासोबतच समानता, अभिव्यक्ती, मानवाधिकार आदी मुलभूत अधिकारांबाबत रोचक उदाहरणाद्वारे माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ज्योती जाखेटे व प्रा.वसिम पटेल यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.