अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलिसांच्या पथकाने स्वत:ला दाऊद इब्राहिम म्हणवून घेणार्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.
शहरातील संविधान चौकातील लाकडी वखारीच्या मागे राहणारा व अनेक गुन्हे दाखल असणारा शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख हा अट्टल गुन्हेगार गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तो स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हणवून घेत होता. तसेच त्याच्यावर चोरी, दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल होते. यंदा ऑगस्ट महिन्यात तो जामीनावर आल्यानंतर दोन गुन्ह्यांमध्ये फरार झाला होता.
दरम्यान, शुभम देशमुख हा धुळे येथे आल्याची माहिती पोलसांना मिळाली होती. या अनुषंगाने अमळनेर पोलिसांनी पथक तयार करून त्याला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार व अपर अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व पोनि. जयपाल हिरे यांच्या निर्देशानुसार उपनिरिक्षक न भुसारे,पोहेकॉ सुनिल हटकर, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ निलेश मोरे व पोकॉ समाधान पाटील यांच्या पथकाने केली.