भरधाव ट्रकच्या धडकेत भाजीपाला विक्रेता ठार

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे हातगाडी लोटत निघालेल्या भाजीपाला विक्रेता ट्रकच्या धडकेत ठार झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता अजिंठा चौफुलीजवळ घडली. राजेंद्र रूपसिंग पाटील (४०, रा. लक्ष्मीनगर, सिंधी कॉलनी) असे मयत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुळचे जवखेडा येथील राजेंद्र पाटील हे दोन वर्षांपासून लक्ष्मीनगरात पत्नी, मुलगा व मुलीसह वास्तव्यास होते. भाजीपाला विक्री करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचे. नेहमीप्रमाणे पाटील हे शुक्रवारी पहाटे ५ वाजता भाजीपाला घेण्यासाठी हातगाडी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाण्यासाठी घरातून निघाले. ५.३० वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळून जात असताना, त्यांना भरधाव ट्रकने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर हातगाडीचेही नुकसान झाले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक हा घटनास्थळावरून पसार झाला होता.

काही विक्रेते भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जात होते. तेव्हा त्यांन रस्त्यावर अपघातात मयत व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. विक्रेत्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी मृतदेह ओळखला. काही वेळानंतर एमआयडीसी पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला.दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content