मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नारायण राणे यांच्याकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच नारायण राणे यांची काँग्रेसवापसी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वीच नारायण राणे यांना काँग्रेसकडून ही ऑफर देण्यात आली होती. या सगळ्यात सोनिया गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यावेळी राणे यांनी स्वतंत्रपणेच लढणे पसंत केले. रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळेच आता नारायण राणे यांच्याकडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्रात काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता नाही. मात्र, नारायण राणेंच्या आक्रमक नेतृत्त्वामुळे ही उणीव भरून काढली जाऊ शकते. यामुळे राज्यात पक्षाला नवसंजीवनी मिळेल, या आशेने काँग्रेसकडून राणेंना निवडणुकीपूर्वीच ‘घरवापसी’चा प्रस्ताव देण्यात आला होता. नारायण राणे जर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस मोठं आश्वासन देण्याची शक्यता आहे.