विद्यापीठात “या” अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्‍यांकन होणार ऑनलाईन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी. व्होक, बी.एस.डब्ल्यू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्‍यांकन ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे त्या त्या महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी. व्होक, बी.एस.डब्ल्यू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्‍यांकन ऑनलाईन पध्दतीने ऑन स्क्रीन डिजीटल इव्हॅल्यूशन सिस्टीम या संगणकीय प्रणालीव्दारे त्या त्या महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे मूल्यांकनात अधिक पारदर्शीपणा येईल तसेच गुणपडताळणी व फेरमूल्यांकनासाठीचा लागणारा वेळ कमी होईल. तसेच उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स मागणी विद्यार्थ्यांने केल्यास त्याच्या मेलवर तातडीने उत्तरपत्रिका पाठविली जाईल. या शिवाय परीक्षांचे निकाल मुदतीच्या आधी लागण्यास मदत होईल. प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. बी. व्होक, बी.एस.डब्ल्यू या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्‍यांकन त्या त्या महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवर केले जाणार आहे.

प्रथम वर्षाच्या सामान्यज्ञान विषयाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पध्दतीने घेण्यात येणारी परीक्षा व व्दितीय वर्षासाठीची पर्यावरण विषयाची परीक्षा आता परीक्षा केंद्रांवर आयोजित न करता ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय देखील या बैठकीत झाला.

विद्यापीठाच्या सर्व पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिकांचे सेटींग व वितरण ऑनलाईन पध्दतीने महाविद्यालयांना केले जाणार आहे. त्यामुळे प्रश्‍नपत्रिका सेटींग व वितरणासाठी कालावधी कमी लागणार असला तरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने खर्च वाढणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्यामुळे हा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. अशी माहिती प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी दिली.

Protected Content