पाळधी ता. धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाळधी येथील दौर्यात त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी विविध कामांच्या घोषणांचा अक्षरश: वर्षाव केला. यात धरणगाव येथे ट्रॉमा केअर सेंटरसह उपजिल्हा रूग्णालयाची लवकरच निर्मिती करण्यात येणार असून पाळधी दूरक्षेत्राच्या ऐवजी येथे स्वतंत्र पोलीस स्थानकाच्या मागणीला देखील मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असून यासोबत आसोदा येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आणि धरणगावातील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचाही मार्ग मोकळा होणार आहे. तर धरणगावात भव्य बाळासाहेब ठाकरे उद्यान उभारण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली. ते पाळधी येथील विश्रामगृहाच्या कामाचे भूमिपुजन आणि २२ कोटी रूपयांच्या सौर उर्जेवरील कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. तर याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या वक्तृत्वशैलीसह शिवसेनेच्या प्रचार-प्रसारासाठी घेतलेले परिश्रम आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून केलेल्या चमकदार कामगिरीबाबत तोंड भरून कौतुक केले.
भव्य सभेत रूपांतर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पाळधी येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या शासकीय विश्रामगृहाचे भूमिपुजन तर २२ कोटी रूपयांच्या सौर उर्जेवर चालणार्या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे पाळधी येथे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांचे आतषबाजी, पुष्पवर्षाव आणि जोरदार घोषणांनी त्यांचे पाळधीकरांना स्वागत केले. यानंतर त्यांच्या हस्ते पाळधी येथे नियोजीत लहान सभेचे भव्य सभेत रूपांतर झाले.
मान्यवरांची मांदियाळी
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, उदयोग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील, आमदार लताताई सोनवणे, आमदार चंदूभाई पटेल, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांच्या हस्ते दोन्ही कामांचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी जिल्हा विकासाचा आढावा प्रस्तुत करत मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. ते म्हणाले की, पाळधी येथे ना. एकनाथराव शिंदे यांचे दुसर्यांदा आगमन होत आहे. तर राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर ते पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात येत असून त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झालेला आहे. जळगाव ग्रामीण तसेच जिल्ह्यातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात वेग आलेला असून काही कामे प्रलंबीत देखील आहेत. या कामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी द्यावी अशी अपेक्षा ना. पाटील यांनी व्यक्त केली.
कामांना येणार वेग : मुख्यमंत्री
याप्रसंगी एकनाथ शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात त्यांनी जे घरात बसून राज्य केले त्याची पोचपावती लोकांनी दिली. तर आम्ही फक्त अडीच महिन्यांमध्ये केलेल्या कामाची आम्हाला ग्रामपंचायतीच्या निकालातून मिळाली आहे. राष्ट्रवादीसोबत जाण्यास आमचा विरोध होता. याबाबत आम्ही अनेकदा सांगून देखील काहीही उपयोग झाला नाही. यामुळे आम्ही नैसर्गिक मित्रासोबत जाण्याचा मार्ग निवडला. आमदारांची अडीच वर्षात न झालेली कामे आम्ही केलीत. यापुढे अजून दोन वर्षे बाकी असून यात विकासाला प्रचंड वेग दिला जाईल असे ते म्हणाले.
होय मी गुलाबरावांचा चाहता ! : एकनाथ शिंदे
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, गुलाबराव हे शिवसेनेची बुलंद तोफ असून मी त्यांचा चाहता आहे. शिवाजी पार्कवरील त्यांचे भाषण हे आपल्यापेक्षा चांगले होते. त्याला लोकांची दाद मिळते हे पाहून गुलाबरावांचे भाषण बंद करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. पण एकनाथ शिंदे कद्रू मनाचा नसून कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे. गुलाबराव पाटलांच्या भाषणाने तरूणाई शिवसेनेकडे आकृष्ट होते. गुलाबरावांच्या जिभेवर सरस्वती आहे यात त्यांचा काय दोष ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत असणार्या व बाळासाहेबांच्या विचारांची बाग फुलवणार्या या गुलाबाला काटे टोचण्याचे काम कुणी केले ? अशी विचारणा देखील त्यांनी केली. पानटपरीवाला म्हणून ज्यांना हिणवले त्यांनीच शिवसेना वाढविल्याचा टोला देखील त्यांनी मारला. गुलाबराव पाटलांनी पाणी पुरवठा मंत्री म्हणून तब्बल २२ हजार योजना मंजूर केल्याबद्दल त्यांनी कौतुकोदगार काढले.
गुलाबभाऊंच्या सर्व मागण्या मान्य !
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात केलेल्या मागण्यांच्या नुसार, या सर्व मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला. गेल्या अनेक दिवसांपासून धरणगाव येथे उपजिल्हा रूग्णालयाची चर्चा सुरू असून ना. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच यासाठी आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी आज यावर शिक्कामोर्तब करत धरणगाव येथे ट्रॉमा केअर सेंटरसह उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येईल अशी घोषणा केली. यामुळे धरणगाव तालुक्यासह परिसरातील जनतेला अद्ययावात आरोग्य सुविधा मिळणार आहेत. यासोबत धरणगावातच बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून बालकवि ठोंबरे यांच्या स्मारकाचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर आसोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला गती देण्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले. लक्षणीय बाब म्हणजे पाळधी येथील दूरक्षेत्राऐवजी येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असावे ही गुलाबभाऊंची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य करत याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले. त्याच प्रकारे नशिराबाद येथे ग्रामीण रूग्णालयाचा मार्ग देखील मोकळा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घोषणा करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात याला जोरदार दाद दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले. तर आभार माजी जि.प. सदस्य तथा ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी मानले. या अतिशय भव्य अशा कार्यक्रमाचे अचूक नियोजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.