अहमदाबाद – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज भाजपवर टीका करतांना एक वेगळेच तर्कट मांडले असून याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आपचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गुजरात दौर्यावर असून आज अहमदाबाद येथे बोलतांना भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, “भाजपवाले विचारत आहेत की, मेधा पाटकर आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असणार आहेत का? यावर माझं उत्तर आहे की, मोदीजी मागच्या दरवाज्यानं सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांनी असंही म्हटलं की, कॉंग्रेस आता संपली आहे. त्यामुळं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं बद करा.” असेही ते म्हणाले.
गुजरात सरकारवर टीका करतांना केजरीवाल म्हणाले की, “येथे व्यापार्यांना आणि उद्योगपतींना छापेमारीच्या धमक्या दिल्या जातात आणि तुमचा धंदा बंद करण्याच्या धमक्या दिल्या जातात. चारीबाजूंना भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीचं वातावरण आहे. गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन देऊ.” अशी ग्वाही त्यांनी दिली.