नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या दिल्ली येथील अधिवेशनात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील शीतयुध्द पुन्हा दिसून आले असून अजितदादांनी भाषण टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नवी दिल्ली येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यात शरद पवार यांनी थेट भाजपला आव्हान दिले. मात्र आजचे अधिवेशन गाजले ते पक्षातील अंतर्ग कलहावरून ! गोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं. नंतर खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं. यातच प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांना भाषण करण्याची विनंती केली. तेंव्हा मात्र अजित पवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याला जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही उत्तर दिल्याने गदारोळ उडाला. यातच, जयंत पाटलांचं भाषण सुरू झालं तेंव्हा अजित पवार व्यासपीठावरून थेट बाहेर पडले. रविकांत वरपे यांनी त्यांची समजूत काढल्याने ते परत आले.
जयंत पाटील यांचे भाषण संपल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी अजित पवाराचं नाव पुकारले. तर अजित पवार उठून बाहेर गेले. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची समजूत घातल्याने अजित पवार पुन्हा व्यासपीठावर आले. तोपर्यंत शरद पवारांचं समारोपाचे भाषण सुरू झालं होतं. यामुळे अजित पवार यांचे भाषण बाकीच राहिले. स्वत: अजित पवार यांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांना संयमित प्रतिक्रिया दिली असली तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह हा नव्याने उफाळून आल्याचे दिसून आले आहे.