चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक आवारात दोन जणांकडून २ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे १२ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा बसस्थानक आवारात दोन तरूण हे संशयास्पद हालचाली करत असल्याची गोपनिय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. चव्हाण यांनी गुन्हे शोध विभागचे स्वतंत्र पथक तयार करून कारवाईच्या सुचना दिल्या. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथकाने सोमवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता सापळा रचून संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (वय-३०) आणि शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय-३२) दोन्ही रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी (हरीयाणा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळ विना परवाना २ लाख ६० रूपये किंमतीचे १२ गावठी पिस्टल आणि ५ हजार रूपये किंमतीचे ५ जिवंत काडतूस आढळून आले. हे सर्व मॅगझिन विक्री करण्याच्या उद्देशाने प्रवाशी बँगेत आढळून आले. पोलीसांनी सर्व माल जप्त केला. याबाबत पोलीस नाईक किरण मधुकर गाडीलोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा दोघांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.