पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम महाविकासाघाडी सरकारने केले. ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केले तिकिटे देऊन निवडून आणले. स्व. बाळासाहेबांनी ज्यांना आशीर्वाद दिला. ज्यांच्यासाठी आम्ही मेहनत केली त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले अशी टिका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या शिवसंवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गेले २५ वर्ष ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला मदत केली. एकीकडे महाराष्ट्राला सुवर्ण दिवस येत असतानाच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले व मी मंत्री झालो हे त्यांना खुपत असल्याने त्यांनी राक्षसी, महत्वाकांक्षी आणि स्वार्थासाठी बंडखोरी केली. मात्र हे सरकार लोकशाही विरोधी बेकायदेशीर व घटनाबाह्य असल्याने ते काहीच दिवसात कोसळणार याची मी तुम्हाला खात्री देत असून आजची ही लोकांची गर्दी पाहण्यासाठी जर गद्दार आमदार येथे आले असते तर त्यांची नजर नक्कीच फिरली असती, असेही ते म्हणाले.
यावेळी सिनेस्टार आदेश बांदेकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या पत्नी श्रीमती कमलताई पाटील, तालुक्याची शिवसेनेची धुरा हाती घेतलेल्या निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी, विधानसभा संपर्कप्रमुख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल पाटील, तालुकाप्रमुख रमेश बाफना, शरद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, कांताबाई मराठे, मुंबई येथील नगरसेविका अंजली नाईक, भडगाव येथील माजी उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, मनोहर चौधरी, आबा कासार, परशुराम पाटील, पंकज पाटील, चेतन भोई, दत्ता जडे, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे, धर्मेंद्र चौधरी, गणेश शिंदे व्यासपीठावर होते.
युवासेनेचे नेते तथा माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे सभास्थळी ०२:४० मिनीटांनी आगमन झाल्यानंतर त्यांनी तबबल २५ मिनिटे मार्गदर्शन केले. या शिवसंवाद यात्रेस पाचोरा मतदारसंघातुन सुमारे ७ हजार नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ठाकरे हे जळगावहून निघाल्यानंतर सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिलदी, गोरडखेडा, या ठिकाणी त्यांचे स्वागत व औक्षण करण्यात आले. सामनेर येथून सुमारे ५०० मोटरसायकलींचा ताफा त्यांच्यासोबत आल्यानंतर वरखेडी नाक्याजवळून पुन्हा ५०० मोटारसायकली रेलीत समाविष्ट झाल्यानंत जारगाव चौफुली मार्गे महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर येथील महाराणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच ठिकाणी पाचोरा शिवसेना व वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून त्यांचा ४ टन फुले वापरून बनविण्यात आलेल्या भव्य असा हार घालून सत्कार करण्यात येणार होता. मात्र राज्यात विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्ती, विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने व काही भागात शेतकरी आत्महत्या करत असल्याने आदित्य ठाकरे यांनी सत्कारास नकार दिल्याने वैशाली सूर्यवंशी यांचाकडून राखी बांधून घेतली.
शिवसंवाद यात्रेत मार्गदर्शन करतांना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, सरकार पाडल्याचे मला दुःख नाही, लोकशाहीत अश्या घटना घडत असतात. माझ्या वडिलांचे आठवड्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन झाल्यामुळे ते अतिशय अशक्तपणा च्या अवस्थेत वावरत असताना या ४० बंडखोरांनी त्यांना धीर देण्याऐवजी त्याच वेळी सरकार पाडण्याचा कट रचला, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी हे ४० गद्दार गोव्याच्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचत होते. या नाचणाऱ्या गद्दारना जनता माफ करणार नाही. यांनी केवळ शिवसेना , उद्धव ठाकरे परिवारवरच गद्दारी केली नसून त्यांनी माणुसकीशी गद्दारी केली. यांच्यामध्ये जराही लाज व शरम शिल्लक असेल तर यांनी ताबडतोब राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा आमदारकी लढवून दाखवावी. हे बंडखोर केवळ स्वार्थासाठीच शिवसेनेतून बाहेर पडले असून यांना शिवसेना संपवून ठाकरे कुटुंबियांना एकटे पडण्याची भूमिका घेतली आहे. मात्र ही शिवसेना कधीही संपणार नसून आज जरी आमच्यावर वाईट काळ असेल तरी राज्याची जनता ही खमबीरपणे आमच्या पाठीशी असून भविष्यात हीच खरी शिवसेना आपल्याला याच शिवसेनेला भवितव्य आहे. स्वार्थापोटी व महत्वकांक्षापणामूळे ४० गद्दार शिवसेना फोडून गुवाहाटीला पळून गेले. ज्यावेळी आसाममध्ये महापूर आलेला असताना व लोक दिशाहीन झालेले असताना यांनी हाटेलात माजा मारून काय झाडी, डोंगार पाहत, सारे काही ओके केले. मात्र यांच्या रक्तात जर खरी शिवसेना असती तर त्यांनी हॉटेलमध्ये डान्स करण्यापेक्षा पुरात उतरून लोकांना मदत केली असती. जे गद्दार शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री पदाच्या अपेक्षेपोटी गेले त्यातील शिवसेना सरकारमध्ये असलेल्या नऊच मंत्र्यांना खाती दिली. तेही हलक्या दर्जाच्या खाती मिळाली मात्र बाकीच्यांना बाबाजीका ठुल्लू मिळाला. शिवसेना सोडून गेलेल्या अनेकांना आजही पश्चताप होत असेल व ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी शिवसेना भवनाचे दरवाजे केव्हाही खुले असल्याचे सांगितले.
यावेळी स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या सुकन्या वैशाली सूर्यवंशी यांनी मी स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या विचारसरणीची असल्यामुळे मी सदैव आपल्यासोबत राहील व कधीही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व माझ्या कुटुंबियावर अनेक वाईट प्रसंग ओढवले असे सांगताना अतिशय भावुक झाल्या होत्या. रमेश बाफना यांनी आमदार किशोर पाटिल व जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला तर अॅड. अभय पाटील यांनी किशोर पटलांवर टीकास्त्र करत ते केवळ कमिशन देणाऱ्या ठेकेदारांनाच वाढवत असून पालिकेत संगत मताने मोठा भूखंड हडप केल्याचे सांगितले. भडगाव येथील गणेश परदेशी यांनी वैशाली सूर्यवंशी या खासदारकी लढणार नसून आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्धच लढाई लढणार आहेत व आम्ही त्यांना जिंकून आणू अशी खात्री व्यक्त केली तर अरुण पाटील यांनी भाजप, एकनाथ शिंदे व बंडखोरी केलेल्या ४० आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.