पहूर, ता . जामनेर (वार्ताहर) उन्हाळ्यात शेताचे बांध पेटविण्याच्या चूकीच्या पद्धतीमुळे झाडांच्या बुंध्यांना आगी लागून झाडे पेटण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे पहूर शिवारातील वृक्षसंपदा धोक्यात सापडली आहे.
उन्हाळ्यात शेतातील काडी कचरा वेचून पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात. यात बांधावरील गवत-काडी,कचरा,पालापाचोळा, काटेरी झुडूपेही पेटविली जातात. मात्र, यामुळे झाडांच्या बुंध्यांनाही आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे झाडे उन्मळून पडत असून वृक्षसंपदा संकटात सापडली आहे. यात रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडांचे प्रमाण सर्वाअधिक आहे. यामुळे त्या गवतात राहणारे किटक, सरडे, पक्षी यांच्याही जिवाला धोका पोहचत आहे. त्यामुळे ‘आग काडीमुक्त शिवार ‘ योजना राबविण्याची आणि या योजनेच्या जनजागृतीची गरज असून संबधित अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.