अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दुष्काळग्रस्त भागातील मंगरूळ, आर्डी, अनोरे, ढेकू, येथे शेतकरी, सर्वसामान्य जनता यांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. तत्पूर्वी परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा पालकमंत्री तालुका दौऱ्यावर आहेत.
यावेळी मंगरूळ येथे झालेल्या सभेत पालकमंत्र्यांनी ”मला चंद्र दिला, सूर्य दिला, असे आश्वासन सभेत देण्याची सवय नाही” असे स्पष्टीकरण दिले. ना. गिरीश महाजन यांनी पाडळसरे धरणाबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? या नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
मंगरूळच्या सरपंच हर्षदा पाटील यांनी तापी नदीवरून पाणीपुरवठा योजना मागितली. तसेच टँकर वाढवून देण्याची मागणी केली, तर आनोरे येथील बाजीराव पाटील यांनी दुष्काळामुळे गाव सोडल्याचे सांगितले. ५० टक्के लोक पाण्यामुळे गाव सोडून निघाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर साहेबराव महाराज यांनी पाणी फौंडेशनचे भजन म्हटले. त्याला पालकमंत्र्यांनी टाळ वाजवून साथ दिली. माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही भजनाला साथ दिली. तसेच पालकमंत्र्यांनी लहान मुलांना चॉकलेटचे वाटपही केले. अनोरे गावाला पाणी फौंडेशनसाठी डिझेलला पैसे अपूर्ण पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच पाण्याचे टँकर वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. चारा छावणी मागितल्यास संस्थेला देऊ, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.