चाळीसगाव (दिलीप घोरपडे) शहरातील रेल्वे स्टेशन ते घाट रोड कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचा रस्ता सतत वाहतुकीच्या प्रचंड कोंडीने जाम होत असल्यामुळे नागरिकांना याचा खूप मनस्ताप सहन करावा लागत असतो. या समस्येवर त्वरित मार्ग काढण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
अनेक महत्त्वाची कामे वेळेच्या आत न करू शकल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यातच गाड्यांचा कर्कश आवाज व धुरामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणालाही सामोरे जावे लागत असते. अनेकवेळा रेल्वे स्टेशन व बस स्टँडला जाऊन गाडी पकडण्याचे काम वाहतुकीमुळे खोळंबते आणि महत्त्वाच्या कामापासून नागरिकांना मुकावे लागते. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात नेतानाही मोठी अडचण होत असते. घाट रोड नागद रोड चौफुली याठिकाणी आठवड्याचे सर्व दिवस वाहतूक कोंडी होत असते मात्र यात कळस म्हणजे शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने या दिवशी एक-एक तास वाहतूक मोकळी होत नाही. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी याठिकाणी नेहमी असतात, मात्र तेही वाहतुकीची कोंडी रोखण्यास असमर्थ ठरतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूने झालेले प्रचंड अतिक्रमण त्यांच्या समोरचे फेरीवाले यांच्यामुळे रस्ता अत्यंत अपुरा होत असल्यामुळे ही वाहतुकीची समस्या नेहमीच भेडसावत असते. संपूर्ण रस्त्याने किराणा दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने यांच्यासमोर अतिक्रमण केलेले शेड व त्या बाहेर लावलेल्या ग्राहकांच्या गाड्या यांची गर्दी होत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना फारच छोटा रस्ता उरत असल्याने ही वाहतूक कोंडी सतत भेडसावत आहे, यावर नागरिकांनी व नगरपालिकेने प्रामाणिकपणे उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.