मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईला आर्थिक राजधानी बनविण्यात गुजराती व राजस्थानी समाजाचेच योगदान असल्याचे वक्तव्य केल्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर प्रखर टीका होऊ लागली आहे.
अलीकडच्या काळात आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणार राज्यपाल भगतसिंंग कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उदघाटन सोहळा पार पडला असून याच सोहळ्यातील त्यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. याप्रसंगी कोश्यारी म्हणाले की,’गुजराती, राजस्थानी निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये,बांधली व गोरगरिबांची सेवा केली’.
दरम्यान, या वक्तव्यातून राज्यपालांनी मराठी जनतेचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली असून त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून टीका केली आहे. मिटकरी यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा’. तर सचिन सावंत यांनी देखील राज्यपालांचे वक्तव्य हे मराठी जनतेचा अपमान असून त्यांनी तात्काळी माफी मागावी.