अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व बोण्ड अळी अनुदान जिरायती तत्वाने देण्यात आले असून ते बागायती तत्वाने देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहे.
२०१७-१८ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना बोण्डअळी अनुदान फक्त कोरडवाहू शेतीप्रमाणे प्रत्येकी ६८०० रुपये वाटप करण्यात आले होते, मात्र तालुक्यात १६ हजार विद्युत पंप आहेत, तसेच तालुक्याच्या पूर्वेकडील भागात गिरणा नदीचे पाट असल्याने बागायती शेती आहे. तालुक्याच्या उत्तरेला तापी नदीतून पाणी उचलून बागायती शेती केली जाते, त्यामुळे तालुक्यात २० हजार शेतकरी बागायतदार आहेत. या बागायतदार शेतकऱ्यांना बोण्डअळी अनुदान १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे मिळावे, तसेच चालूवर्षी दुष्काळी अनुदानही बागायती शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपयांप्रमाणे तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपयांप्रमाणे देण्यात यावे. याबाबत गेल्यावर्षीही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती, तरी या मागणीची तत्काळ दखल घेऊन न्याय मिळावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेतकी संघाचे माजी चेअरमन संजय पुनाजी पाटील, शिरूड विकासोचे चेअरमन सुभाष पाटील, नारायण रावा पाटील, जितेंद्र शिवाजी पाटील ढेकू सिम, नथु मनसाराम पाटील गडखांब, किशोर पाटील अमळनेर, संजय पाटील शिरूड, हेमंत पाटील मंगरूळ, विलास पाटील अमळगाव आदींच्या सह्या आहेत.