जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानात काहीसा आश्चर्यकारक आणि अनाकलनीय प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. एका रुग्णाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर ११६ लोखंडाचे खिळे, तारा आणि काडतूसे काढण्यात आली आहे. यशस्वी ऑपरेशन करून डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून या वस्तू बाहेर काढल्या आहेत.
भोला शंकर (वय ४२) असे या रुग्णाचे नाव आहे. अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला बुंदी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात खिळे आणि तारा दिसल्या. डॉक्टरांनी लगेचच त्याच्या कुटुंबीयांना सर्जरी करण्यास सांगितले. दीडतासांचे ऑपरेशन करून डॉक्टरांनी भोलाच्या शरीरातील सर्व लोखंडी वस्तू काढल्या आहेत. पण, या वस्तू पोटात गेल्याच कशा? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. भोला पूर्वी बागकाम करत असे, मात्र त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने ते काम बंद केले होते. त्यावरून मानसिक स्थिती बरोबर नसल्याने भोलानेच या लोखंडाच्या वस्तू खाल्ल्या असतील, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.