गडचिरोली (वृत्तसंस्था) एटापल्ली तालुक्यात पंतप्रधान सडक योजनेच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ करून नासधूस केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. दरम्यान, राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सीमेकडील भागात राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली होती.
एटापल्ली तालुक्यातील एमलीजवळ पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याची कामं सुरू होती. त्यासाठी रस्त्यावर रोडरोलर, पाण्याचा टँकर, दोन मिक्सर मशीन आदी साहित्य आणण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री नक्षलवाद्यांनी या ठिकाणी येऊन या सर्व साहित्यांना आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, एटापल्ली तालुक्यातीलच कारका गावाजवळील रस्त्याच्या कामावरील काही वाहने माओवाद्यांनी बुधवारी रात्री जाळून टाकली होती.