अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत असलेल्या ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांचे चार महिन्यांपासून तर काहींचे एक वर्षापासून मानधन जमा झाले नाही. उपासमारीची वेळ आल्यामुळे आहे. त्वरित मानधन न मिळाल्यास संगणक परिचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल महाराष्ट्राचे काम करीत असलेल्या ग्रामपंचायत मधील संगणक परिचालकांचे मागील चार महिन्यांपासून व काही संगणक परिचालकांचे एक वर्षापासून मानधन जमा न झाल्याने संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात ६० संगणक परिचालक कार्यरत असून त्वरित मानधन न मिळाल्यास संगणक परिचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना तसेच इतर जनहिताचे कार्य थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी संगणक परिचालक महत्वाचा दुवा आहे. ग्रामपंचायत स्तरावर मागील दहा वर्षांपासून डिजिटल महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने संगणक परिचालकांचे कार्य सुरू आहे. सुरुवातीला तुटपुंज्या मानधनावर काम करीत असताना सद्यस्थितीत ७ हजार रुपये मानधन संगणक परिचालकांना मिळत आहे. एका खासगी कंपनीकडे मानधनाचा कंत्राट देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ८६९ संगणक परिचालक कार्यरत आहेत. महागाईच्या काळात मानधनावर काम करीत असताना मागील चार महिन्याचे तर काहींचे मागील वर्षापासून मानधन जमा झाले नाही. प्रशासनाकडून त्याबाबतीत कुठल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. उलट नवीन कामांचा ताण संगणक परिचालकांवर लादला जात असल्यामुळे संगणक परिचालक त्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील केंद्र चालकांना त्यांच्या केलेल्या कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत संगणक परिचालकांनी मागील वित्त वर्षात ग्रामपंचायतीचे संपूर्ण ऑनलाइन ऑफलाइन कामे पूर्ण केली आहेत.
मागील २०२१-२२ वित्त वर्ष संपून आता नवीन २०२२-२३ वित्त वर्ष चालू झाले आहे. मात्र तरीही संगणक परिचालकांचे मानधन जमा करण्यात आले नाही. तरी वरिष्ठ अधिकार्यां नी याकडे लक्ष देउन मानधन लवकरात लवकर जमा करण्यात यावे. अशी मागणी संगणक परीचालकांनी केली आहे.
कंत्रादारांकडून मानधनासाठी होतो नेहमीच उशीर –
संगणक परिचालकांना कंपनीकडून कधीच वेळेवर वेतन देण्यात येत नाही. वारंवार वेतनासाठी आंदोलन करून निवेदन देऊनदेखील कंपनीकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कंपनीवर कोणाचाच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. इतर कामाचे बाकी असलेले पैसे पण अद्याप बर्याचच ऑपरेटरांना मिळाले नाहीत. कंपनीकडून जर वेळेवर दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.