मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणुकांच्या तारखांबाबत संभ्रमाचे वातावरण असतांना आज राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
महापालिकांची अंतिम प्रभाग रचना केल्यानंतर आता आरक्षणाची सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत माहिती जाहीर केली आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या ३१ मे रोजी होणार आहे. तर आरक्षण १३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची आरक्षणाची सोडत नंतर जाहीर होणार आहे.
राज्य निवडणुक आयोगाने आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यात लवकरच नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामधील १३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. तर यासोबत लागलीच नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत सुध्दा जाहीर होण्याची शक्यता आहे.