पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
येत्या चारपाच दिवसांत, २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता आहे.
गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २० आणि २१ मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत एकदोन भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० किलोमीटर प्रतितास ते ६० कि.मी.) होण्याची शक्यता आहे.
बुधवारी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडय़ातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.