जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील परिवर्तन संस्थेचा कला महोत्सव आता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजीत करण्यात आलेला आहे.
जळगावच्या परिवर्तनतर्फे ‘परिवर्तन कला महोत्सव’ १३, १४ व १५ मे दरम्यान पु. ल. देशपाडे सभागृह, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे. रंगकर्मी, अभिनेते संदीप मेहता, अभिनेत्री वीणा जामकर, रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर, अभिजित झुंझारराव यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. याआधी पुणे, जळगाव, धुळे, जामनेर, कणकवली, कोल्हापूर येथे परिवर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानंतर आता मुंबई येथे हा महोत्सव होणार आहे.
‘परिवर्तन कला महोत्सव’ हा नाट्यलेखक स्वर्गीय जयंत पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला आहे. या तीनदिवसीय महोत्सवाची सुरुवात बहिणाबाईंच्या कविता व गाण्यांवर आधारित अरे संसार संसार सांगीतिक कार्यक्रमाने १३ मे शुक्रवारी रात्री ८ वाजता होईल. कार्यक्रमाची संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे. १४ मे शनिवारी रात्री ८ वाजता रोजी श्रीकांत देशमुख लिखित व शंभू पाटील नाट्यरूपांतरित योगेश पाटील दिग्दर्शित नली एकलनाट्य, १५ मे रविवारी दुपारी ४ वा. शंभू पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित अमृता साहिर इमरोज हे नाटक सादर होणार आहे. तीन दिवस एकाच संस्थेची निर्मिती असलेले तीन उत्तम कार्यक्रम असलेला हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे